ChatGPT शिका, नोकरी मिळवा !
सध्या तंत्रज्ञान क्षेत्रात ChatGPT आणि AI हे शब्द इतके रुजले आहेत की याशिवाय इंटरनेट वापरणे हा गुन्हा आहे की काय असे वाटू लागले आहे. या ChatGPT मुळे नेमका काय परिणाम होईल, किती नोकऱ्या जातील अथवा निर्माण होतील हे अजून पुरेसे स्पष्ट झालेले नाही. ChatGPT हे नवीन आहे आणि अनेक सोयी आहेत हे खरे असले तरी सर्व काही या तंत्रज्ञानावर सोपवून मोकळे व्हायचे की स्वतः काही विचार करून लेखन करायचे याचाही निर्णय करावा लागेल. आयते मिळणारे सगळेच काही चांगले नसते हे लक्षात ठेवलेले बरे !
नोकरी मिळण्यासाठी प्रत्येक क्षेत्रानुसार, पदानुसार, गरजेनुसार शैक्षणिक वा कामाची पात्रता लागते. आधीच नवीन नोकरी मिळविण्यात अडचण आणि त्यात कंपन्यांच्या वेगवेगळ्या अपेक्षा पाहिल्या तर भविष्यकाळात नोकरी मिळवणे किती कठीण जाणार आहे, हे लक्षात येते. जपानमधल्या एका कंपनीचे उदाहरण लक्षात घ्या. टोकियो शहरात काम करणाऱ्या LayerX Inc. या कंपनीने जाहीर केले आहे की नोकरीसाठी उत्सुक असाल तर तुम्हाला ChatGPT टाळून चालणार नाही. ChatGPT संदर्भात परीक्षा द्यावी लागेल, OpenAI Inc., आणि Notion AI. यांनी तयार केलेल्या ChatGPT वर काम करता आले पाहिजे. हे करत असाल तरच नोकरीसाठी अर्ज करा. ही कंपनी Digitizing Business Transactions या प्रकारात काम करते. कंपनीच्या या अटीनंतर किती तरुणांनी / तरुणींनी अर्ज केले हे कळले नाही.
जगातील बऱ्याच बँकांनी ChatGPT चा वापर अत्यंत मर्यादित पद्धतीने करण्याचे ठरवले आहे. न्यूयॉर्क मधील शाळांनी तर ChatGPT वापरण्यावर पूर्ण बंदी घातली आहे. जपानमधील अनेक अर्थसंस्थांनी त्यावर बंदी घातली आहे किंवा त्याचा मर्यादित वापर करण्याचे ठरवले आहे. अशा वेळेस वर उल्लेखलेल्या कंपनीने ChatGPT अत्यावश्यक केले आहे. दोन दिवसांपूर्वी OpenAI Inc. ने GPT -४ लाँच केले आहे. त्यात नेमक्या काय सुधारणा आहेत हे लक्षात यायचे आहे. जसजशी त्यात सुधारणा होईल तसतसे आपले त्यावर अवलंबून राहणे वाढणार आहे. हे लक्षात येईपर्यंत खूप उशीर झालेला असेल.
कोणत्याही तंत्रज्ञानात सतत सुधारणा होत असतात आणि ते आवश्यकही आहे. नवीन तंत्रज्ञान आहे म्हणून ते नाकारायचे असे करून चालणार नाही अथवा त्यावर पूर्णतः अवलंबून राहणेही परवडणारे नाही. कुठेतरी सुवर्णमध्य काढायला हवा.
जपानमधील कंपनीने सुरुवात केलीच आहे, आता जगातील अन्य कंपन्यांनीही ChatGPT वर काम करणे 'मस्ट' केले तर नोकरीत असणाऱ्या अथवा नोकरी मागू इच्छिणाऱ्याला स्वतःची स्किल्स किती upgrade करावी लागतील याचा विचार प्रत्येकाने केलेला बरा ! या जपानी कंपनीचे मुख्य HR अधिकारी म्हणतात की, ChatGPT हे अचूक नाही, याची आम्हालाही कल्पना आहे. परंतु असे नवे तंत्रज्ञान अजिबात न वापरण्याचा अतिघाबरटपणा केल्यास ते अत्यंत धोकादायक ठरू शकेल.
ChatGPT सफाईने वापरणारे २० कर्मचारी दरवर्षी घेतले जातील, असे या कंपनीने जाहीर केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा