ऑनलाईन Newsletters हा उत्तम पर्याय
कोरोनामुळे जगात सर्वच क्षेत्रात मोठी उलथापालथ झाली. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, लहान व्यवसाय बंद पडले, घरगुती व्यवसाय सुद्धा त्यातून सुटले नाहीत. अजून कोरोना नामशेष झाला नसला तरी यातील काही उद्योग पुन्हा सुरु होत आहेत, बंद न झालेले पुन्हा बाळसे धरत आहेत ही मोठीच शुभवार्ता आहे. उलथापालथ झालेल्या क्षेत्रात माध्यम क्षेत्राचाही समावेश आहे. विशेषतः वर्तमानपत्रे, मासिके या मुद्रित प्रकाराला मोठा फटका बसला. तेही आता यातून बाहेर पडत आहेत. परंतु कोरोनापूर्व काळातील वाचकसंख्या अजून काहीजणांना परत मिळवता आलेली नाही. कोरोना काळात वाचकांना ऑनलाईन वाचनाची ओढ लागली यामुळे हे होत आहे. कोरोना ऐन भरात होता तेव्हा वर्तमानपत्रांचे वितरण बंद करण्याचा राज्य सरकारचा निर्णय वर्तमानपत्रांच्या मुळावर घाव घालणारा ठरला. कारण नंतर ऑनलाईन गेलेले वाचक ऑफलाईन येण्यास वेळ लागला. बऱ्याच जणांनी ऑनलाईन राहणेच पसंत केले. घरात आधी चार वर्तमानपत्रे येत असली तर आता दोनच येतात, ही वस्तुस्थिती आहे. बंद केलेली वर्तमानपत्रे महत्वाची नव्हती असा याचा अर्थ नाही. आर्थिक परिस्थिती आणि ऑनलाईन वाचायची सवय ही दोन प्रमुख कारणे...